०८ जुलै २०१३

अहिराणीला समृद्ध करण्याचा वसा प्रत्येकाने जपावा

नाशिक - अहिराणीएवढा गोडवा इतर भाषांना नाही. जिच्यामुळे आपली जडण-घडण झाली, त्या अहिराणी भाषेला समृद्ध करण्याचा वसा प्रत्येकाने जपला पाहिजे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे केले. चौथ्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. निकम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार प्रतापदाद सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, आमदार नितीन भोसले, नाना महाले, रवींद्र सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षा शकुंतला चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील आदींसह विविध मान्यवर या वेळी दा. गो. बोरसे विचारमंचावर उपस्थित होते.

ऍड. निकम म्हणाले, की अहिराणी भाषा चौथ्या शतकापासून प्रचलित आहे. मराठीचा उदय 18 व्या शतकात झाला. मात्र, तिला राजाश्रय मिळाल्याने ती राजभाषा झाली. अहिराणीला ते भाग्य लाभले नाही. या भाषेला जो गोडवा आहे त्याची सर इतरांना येत नाही. गोव्याच्या कोकणी भाषेला, कोकणातील मालवणी भाषेला बोलीभाषेचा दर्जा मिळतो. मात्र, अहिराणीला अजून दर्जा मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, की अहिराणी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी विविध साहित्य प्रकाशित झाले पाहिजेत. ज्या भाषेमुळे आपली जडणघडण झाली तिला समृद्ध करण्याचा निर्धार आपण प्रत्येकाने केला पाहिजे.

श्री. भुजबळ म्हणाले, की साहित्यात आता मक्तेदारी राहिलेली नाही. विविध भाषेतील व चळवळीचे साहित्य संमेलने होत आहेत. खानदेशी बांधवांचा आजचा उत्साह पाहिल्यानंतर अहिराणीचेही भवितव्य उज्ज्वल आहे. जगभरात सहा हजार सातशे बोलीभाषा आहेत. त्यातील साडेतीन हजार भाषा शतकाअखेर नष्ट होणार आहेत. त्यामुळे भाषेच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्‍न विविध बोलीभाषांसमोर आहे. अहिराणी भाषा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी व तिच्या संवर्धनासाठी अशा संमेलनांचे नितांत गरज आहे. प्रत्येकाने अहिराणी भाषेत बोलताना लाजायचे सोडले, तर खानदेशी बांधव पहिली लढाई जिकल्यात जमा होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यापुढे खानदेशी माणसाशी बोलताना अहिराणीत बोलावे. नेहमी भाषेचा अभिमान बाळगावा, अशी सूचना त्यांनी केली. उषा सावंत यांनी प्रास्ताविक केले. रोहिदास पाटील यांनी स्वागत केले. अहिराणी भाषेतील लोकगीतातून उपस्थितांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर उज्ज्वल निकम यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी मंत्री दौलतराव आहेर, डॉ. शोभा बच्छाव, मंजुळा गावित, साहेबराव पाटील, गुलाबबापू पाटील, सुभाष देवरे, लता पाटील, सुभाष अहिरे, रमेश वरखडे, अशोक धिवरे, रमेश सूर्यवंशी आदींचा सत्कार करण्यात आला. के. डी. पाटील यांनी आभार मानले. 
Reference from Sakal : December 04, 2011 AT 04:00 AM (IST)

- अहिराणी साहित्य